Monday 27 February 2017

आपले मूल सुखा-समाधानात, आनंदात वाढावे

प्रवास पालकत्वाचा - चेतन व प्रीती एरंडे
आपले मूल सुखा-समाधानात, आनंदात वाढावे, असे सगळ्यांसारखेच आम्हालाही वाटत होते. आम्हाला जे मिळाले नाही, ते आमचा मुलगा स्नेह याला देणे हेच त्याचे सुख असे वाटायचे. महागडी खेळणी, खाऊ आणून लाड तर फटके देऊन ‘संस्कार’ करत होतो.
एक दिवस राजीव तांबे यांच्या टीव्हीवरच्या कार्यक्रमात प्रत्येक मूल वेगळे, त्याची गरज वेगळी, मुलाला बदलण्याच्या खटाटोपापेक्षा पालकांनी स्वतः बदलणं अवश्यक हे ऎकलं आणि आमच्या विचारप्रक्रियेत, संगोपनात मुळापासून बदल झाला. आपले मूल आपल्यापेक्षा वेगळे आहे, त्याचे व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे हे मान्य करत आम्ही बदलायला सुरुवात केली.
स्नेहने आनंदाने शिकावे यासाठी त्याला मातृभाषेतून शिकवायचे ठरवले. मुलांचे कुतूहल, गोष्टी प्रत्यक्ष हाताने करून शिकण्याकडे असलेला कल हे समजले. मग असे शिक्षण देण्यार्याट शाळांचा शोध सुरू झाला. स्नेह दुसरीत जाईपर्यंत चार शाळा बदलून बघितल्या. ‘खर्‍या’ शिक्षणासाठी शाळेच्या चौकटीबाहेर जाऊन विचार करावा लागेल, हे जाणवले. पुन्हा मार्गदर्शन घेतले. उत्तम शिक्षण हवे तर उत्तम गुरु आवश्यक, हे समजले. आणि आईशिवाय मुलाचा चांगला गुरु कोण बनू शकेल, असा विचार करून स्वशिक्षणाचा, होमस्कुलिंगचा निर्णय घेतला.
होमस्कुलिंगची सुरुवात केली आणि शिक्षणाने पुस्तक, घोकंपट्टी आणि परिक्षेच्या जाळ्यातून बाहेर पडून जीवनाला स्पर्श केला. स्नेह फक्त गणित, मराठी, इतिहास असे विषय शिकत नव्हता. तो स्वयंपाक करायला, घर स्वच्छ करायला, दुकानातून वस्तू आणायला, लोकांशी आत्मविश्वासाने बोलायला, प्रत्येक गोष्ट मुळातून समजून घ्यायला लागला. उत्साहाने नवीन मित्र गोळा करू लागला. वयाचे बंधन नसल्यामुळे त्याला सर्व क्षेत्रातले, सर्व वयाचे आणि काही भारताबाहेरचेसुद्धा मित्र मिळाले.
स्नेह आता दहा वर्षाचा आहे. होमस्कुलिंगसाठी लोक आमचे कौतुक करतात, नावेही ठेवतात. आम्ही समविचारी पालकांच्या संपर्कात राहून ‘सर्जनशील पालक’च्या माध्यमातून विचारांची देव-घेव करतो. फेसबुकवर Surekha MondkarFaruk S. Kazi, Bhausaheb Chaskar, Shivaji ManeVasant KalpandeEknath AvhadVeena RaoteVeena Gavankar Manjusha Jadhav Manjusha Inamdar Jadhav वगैरेंच्या संपर्कात राहिल्यामुळे नवीन उर्जा मिळते.
स्नेहकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, त्यावेळी त्याचे काय चुकले याऎवजी आमचे काय चुकले याचा विचार करतो. आणि आम्हाला उत्तर मिळते! त्याने टीव्ही, मोबाईलवर जास्त वेळ घालवू नये, असे वाटत होते. पण मग त्या वेळात त्याने करायचे काय, हे समजत नव्हते. मग आम्ही राजीव तांबेंचे गंमतशाळा, arvindguptatoys.com व युटूबच्या मदतीने अनेक उपक्रम शोधून काढले. मागच्या दोन महिन्यांपासून आम्ही तिघांनी मिळून टीव्ही बंद करण्याचा निर्णय घेतला. तर मोबाईल वापरताना वस्वयंशिस्त आणण्यासाठी तिघांनी मिळून नियम बनवले. लिहायला कंटाळणारा स्नेह आता लेख, गोष्टी लिहितो. बोलायला घाबरणारा स्नेह शाळेत जाऊन मुलांसाठी कार्यक्रम घेतो. ऑफिस आणि घर एवढेच विश्व असलेला त्याचा बाबा मी आणि घरात अडकून राहिलेली त्याची आई होमस्कुलिंगच्या निमित्ताने जगाशी जोडले गेलो आहोत.
यशस्वी होण्याचे परिमाण जर आनंद असेल तर आमच्या होमस्कुलिंगचा प्रवास यशस्वीपणे सुरु आहे.
chetanerande@gmail.com
हेमंत कर्णिक.

प्रयोगातून शिकणारा नवा शेतकरी

जिल्हा नंदुरबार. तालुका नवापूर. गाव करंजी. डोंगराळ,आदिवासी बहुल परिसर. इथल्याच सुरेश गावित या तरुणाची ही गोष्ट. प्रशासनही सेवा-सुविधा देण्यात मागे पडत असतांना येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतीत बदल घडविण्याचा निर्णय घेतला. पारंपारिक पीकपध्दती, आस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्याला येणारे नैराश्य सुरेश यांनी जवळून अनुभवलेले. वडिलोपार्जित १० एकरपेक्षा जास्त जमिन. घरून शेती कसायचा सल्ला मिळाल्यावर पारंपारिक चौकट मोडत सेंद्रीय शेतीवर त्यांनी भर दिला. यासाठी जवळपासच्या गावात, राज्यात कुठे कुठे सेंद्रीय पध्दतीने शेती होते याचा इंटरनेटच्या मदतीने, कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने अभ्यास केला. त्यानुसार पिके घेण्यास सुरूवात केली. केवळ शेणखत आणि गोमुत्राच्या मदतीने तांदळाचे पीक घेतले. मागील वर्षाच्या तुलनेत खर्च कमी आला आणि पीकही चांगले आले. पण मार्चमध्ये पाण्याची कमतरता जाणवली. मग सरकारी शेततळे योजनेतून प्रश्न सोडवला. यातूनच त्यांना नव्या व्यवसायाची दिशा दिसली. शेततळ्याचा वापर करून त्यांनी शेतीला पूरक अशी ‘मत्स्यशेती’ सुरु केली. 
यासाठी गुजरात येथील खडकी, नंदुरबार जिल्हातील कोळदा येथील कृषी प्रशिक्षण केंद्रात जाऊन रीतसर अभ्यास केला. आणि मत्स्यबीज शेततळ्यात सोडले. मत्स्यबीजाची वाढ कशी होते, हे न समजल्याने पहिले सहा महिने दुर्लक्ष झाले. पण सहा महिन्यानंतर तळ्यात मासे दिसू लागले. मग दिवसातून तीन वेळा मत्स्यखाद्य देण्यास सुरूवात केली. सेंद्रीयवर भर असल्याने भाताची तूस, मका, ज्वारी यापासून तयार केलेले खाद्यच ते माशांना देतात. पहिल्या वर्षी केलेला खर्चही निघाला नाही. घरचे नाराज झाले. पण पुन्हा नव्या जोमाने त्यांनी कॉमन कार्फ, पेंगासी, रघुकोला या जाती आणल्या. यावेळी मात्र यातून दीड लाखांचे उत्पन्न मिळाले. 
दरम्यान, आंतरपीक पध्दतीने भाजीपाल्याची लागवड केली. शेततळ्यातील पाण्यात मत्स्यखाद्य, विष्टा, शेवाळ होतेच. या सेंद्रीय पाण्यावर वांगे, टोमॅटो, तुरीच्या शेंगा, शेवगा अशी पीके घेत बाजूला बांबूची झाडे लावली. एका वाफ्यात झेंडूची बागही फुलवली. आठवडे बाजारात त्याची विक्रीही केली. एकीकडे कांदाही झाला. पण भाव पडले. तरीही खचून न जाता कांद्याचा पाला, शेतातील ओला, सुका कचरा यापासून गांडुळ खत प्रकल्प तयार करून त्याचा शेतीसाठी वापर सुरू केला. 
आज सुरेशने त्याच्या सहकाऱ्यांसोबत व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. त्यातून शेतात सध्या काय सुरू आहे, काय करता येईल याची चर्चा होते. सुरेश म्हणतो, ‘‘घरचे म्हणायचे की पारंपारिक पध्दतीने पीक घ्यावे. सालाबादाला ठराविक उत्पन्न, नफा घ्यावा. काय उपयोग या प्रयोगशीलतेचा? पण माझं ठरलं आहे, पारंपारिक पीकपध्दतीपेक्षा शेतीत वेगवेगळे प्रयोग करून पहायचे. कधी थोडं नुकसान होतं पण त्यातून खूप काही शिकायला मिळतं’’. सुरेशच्या या प्रयोगशीलतेचा प्रशासनानेही गौरव केला आहे.
प्राची उन्मेष.

प्रेमविवाहाचा कॉमन धागा

सुरेश आणि पत्नी सुवर्णा भुजबळ दोघं चळवळीत. तोच त्यांच्या प्रेमविवाहाचा कॉमन धागा. सुरेश सांगतात, “सुमेधनं चळवळीचा वारसा पुढे न्यावा, असं मन म्हणे. ते त्याच्यावर लादणं म्हणता येणार नाही. स्वाभाविक म्हणा, हवं तर. मात्र २१ वर्षं तो या धारणेला गुंगाराच देत आला! त्याला रुचेल, पटेल तेच करणार. माझ्या गृहितकांना धक्के देणाऱ्या सुमेधच्या बोटाला धरून पालकत्वाचा प्रवास सुरू आहे. पाचवीत असताना २५ मार्कांच्या एका छोट्या परीक्षेत सुमेध पास झाला नाही. का? तर विज्ञानाचं ५ मार्कांचं प्रोजेक्ट करत होता. त्याचं सबमिशन काही दिवसांनंतर होतं. तरी तेच करत बसला. आजही व्यवहाराकडे पाहून प्राधान्यक्रम ठरवणं त्याला जमत नाही.” 
 आर्ट कॉलेजमधलं कलाशिक्षण पठडीबाज असतं, त्या क्षेत्रातल्या प्रयोगांबद्दल शिक्षक अपडेट नसतात... असं म्हणत त्यानं दहावीनंतरचं ते शिक्षण पूर्ण केलं नाही. मग आर्को दत्तांच्या फोटोग्राफीच्या शिबिराला गेला. झपाटून जाऊन असाइनमेंटस केल्या. वयाची अट पूर्ण होण्याआधीच त्यांच्याकडच्या कोर्सलाही हट्टानं प्रवेश घेतला. आज तो त्या क्षेत्रात चांगलं काम करत आहे. इव्हेंट फोटोग्राफीच्या चांगले पैसे देणार्‍या कितीतरी ऑफर्स त्याला येतात. त्यातून या खर्चिक छंदाचे खर्च निभावता येतील. पण तो मात्र त्याला आवडणारीच फोटोग्राफी करतो. 
चळवळीच्या वातावरणाचे संस्कार तो विसरलेला नाही, असं सुरेश म्हणाले. National Geographic च्या एका स्पर्धेत सुमेधनं दुसऱ्या स्पर्धकाचं पाण्यात पडलेलं मेमरी कार्ड काढून दिलं. त्या क्षणी फक्त स्पर्धा महत्त्वाची असूनही त्यानं हे केलं. अशीच घटना शाळेत असताना घडली होती. कंप्युटर, इंटरनेटमधली त्याची गती बघून प्रिन्सिपलनी त्याला एक अडचण सोडवायला बोलावलं. त्या वेळी त्याच्या लक्षात आलं की शाळेच्या पीसीचा पासवर्ड ओळखला जाऊ शकतोय. त्यात परिक्षेसाठी सेट केलेले पेपरही होते. पण सुमेधनं सरांना ते वेळीच ध्यानात आणून दिलं.” असं कौतुक करून सुरेश पुन्हा सांगतात की चळवळीबद्दल बोलू लागलं की ‘पकवू नका’ असे सुमेधचे उद्गार असतात! 
सुरेश स्वतः दलित वस्तीतून आलेले. सुवर्णाच्या सरकारी नोकरीमुळे सुमेधला बालपण स्थैर्याचं मिळालं. संघर्ष, अवहेलना त्यानं पाहिली नाही. असं चांगलं वातावरण सर्व मुलांना मिळावं आणि यासाठी चाललेलं काम त्यानं समजून घ्यावं, ही त्यांची अपेक्षा. अर्थात सुमेधला घडवण्याबाबत पालक म्हणून आमचे रॅशनल विचार नव्हते, हेच खरं, असं मान्यही करतात. त्यांच्या पिढीतल्या सर्वच पालकांना अनुभवाला येतो तो मुलांच्या मित्रमैत्रिणींमधला मोकळेपणा. ही जवळीक अचंबित करणारी, स्वत:ला प्रश्न विचारायला लावणारी नि हेवा वाटावी अशी आहे, असं सुरेश सांगतात.
“समाजसुधारणेचं जू आपल्या बापानं (बाबासाहेबांनी) आपल्या खांद्यावर दिलं आहे”, असं म्हणत वस्तीतल्या मुलांसाठी तळमळणारे सुरेश जन्माला घातलेल्या एकाच मुलाचे बाप नसतात. अजूनही वंचित मुलं आहेत... त्यांना स्थैर्य मिळत नाही... त्यांचे आईवडील शिक्षित नाहीत... त्यांना exposure नाही... ही त्यांची सततची खंत. त्यांच्यातला पालक असा झुरतोय.
- सुलेखा नलिनी नागेश

शेतीत ’राम’ आहे

 उत्तम शेती - शेतीत ’राम’ आहे! 
शोध सीताफळांच्या नव्या जातींचा -एकरी पाच लाख रुपयांचे उत्पन्न - 
----
बार्शी तालुक्यातलं गोरमाळे गाव. नवनाथ मल्हारी कसपटे यांची गोरमाळेत पडीक जमीन. चाकोरीबध्द पारंपारिक शेतीतून हाती काहीच लागत नव्हते. दमछाक झालेले कसपटे नव्या शेतीच्या प्रयत्नात होते. त्यांना वेगळ्या आकाराच्या सीताफळांनी भुरळ घातली. नवनाथरावांनी या सीताफळाला वाढवले. त्यानंतर त्याच्यापासून काही नवीन जाती विकसित करण्यास सुरुवात केली. बांधावर, विहीरीच्या काठावर, नदी-ओढ्याच्या किनारी आढळणारे, शेतकऱ्यांकडून कायम दुर्लक्षित असलेले सीताफळ आज काळ्याभोर रानात डौलाने उभे आहे. गेल्या १० वर्षात संशोधन करून त्यांनी सीताफळाच्या ४ जाती विकसित केल्या आहेत. तर ३२ जातींचं संकलन त्यांच्याकडे आहे. यापैकी बहुतांश जातीची सीताफळे परदेशात पोचली आहेत.

विकसित केलेल्या जातीमुळे उत्पादकता वाढली. आणि सीताफळांचा आकारही मोठा, चवीला मिठासदार आणि अधिक गर असल्याचे लक्षात आले. यशस्वी जातींना नवनाथरावांनी स्वत:च्याच नावाची एनएमके-१ पासून एनएमके-३ अशी ओळख दिली. चौथ्या जातीचे नाव फिंगर प्रिंट. कारण हे दिसते बोटांच्या ठशासारखे. प्रत्येक जातीची वेगळी वैशिष्ट्ये. काहींना अधिक गर तर काहींचा रंग आतून गुलाबी. काही रानटी सीताफळांचा हंगाम संपल्यानंतर येतात. काहींचे वजन प्रत्येकी चक्क दीड ते अडीच किलो. प्रयत्नाची पराकाष्ठा, जिज्ञासू वृत्ती आणि सीताफळाला मिळवून दिलेली स्वतंत्र बाजारपेठ यामुळे नवनाथ कसपटे आज अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे अध्यक्ष बनले आहेत. 
सध्या कसपटे यांच्या शेतात २५ एकरवर सीताफळांची बाग असून, ५ ते ७ एकरवर सीताफळांची रोपवाटिका आहे. वर्षभर आधीच रोपांची आगाऊ नोंदणी झालेली असते. शेकडो कामगार शेतात काम करतात. अत्यल्प पाण्यावर, खडकाळ-माळरानावर फुलणारे सीताफळ कुठल्याही किडीला बळी पडत नाही. शेतीत ‘राम’ नाही म्हणणाऱ्यांनी कसपटे यांच्या सीताफळ शेतीचे निरीक्षण करायला हवे.
काही मिठास जातींना मुंबई-पुण्यात मोठी मागणी आहे. या सीताफळातून ७ ते १० टन उत्पादन मिळते. सीताफळ विक्रीतून एकरी ५ लाख रुपयांपर्यंत, तर २५ एकरात १ कोटी १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे ते सांगतात.
गोरमाळे येथे सिताफळाच्या संशोधनासाठी छोटी पण अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारली आहे. त्यांच्या मधुबन नर्सरीमध्ये जागतिक पातळीवरील ३२ प्रकारचे सीताफळ वाण उपलब्ध असून पैकी २१ प्रकारांवर प्रयोग सुरू आहेत. त्यांच्या एनएमके-१ तथा गोल्डन वाणाला चांगली चव, टिकवण क्षमता, कमी बिया, देखणेपणा, आकार आणि मिळणारी किंमत चांगली असल्याने या रोपांना चांगली मागणी आहे. या सिताफळाची मुंबई, पुणे, दिल्ली आणि कुवेतमधील बाजारात चांगल्या दरात विक्री होत आहे. कसपटे यांच्या ‘एनएमके वाणांचं संशोधन’ यावर पंजाब विद्यापिठातील योगेश गुप्ता यांनी पीएचडी मिळविली आहे. विकसित केलेल्या सीताफळांच्या पेटंटसाठीही आता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
नवनाथ कसपटे यांचा संपर्क क्र. 9822669727

 चंद्रसेन देशमुख.

समीकचा जन्म माझ्यासाठी खूपच सुखावह होता

समीकचा जन्म माझ्यासाठी खूपच सुखावह होता. आईपण जगण्यासाठी मी खूप उत्सुक होते. मुलाच्या जन्मानंतर आधी वर्षभराची सुट्टी घेतली. मग ऑफिसला जाऊ लागले. आणि नंतर नवरा संदीप याच्याशी सल्लामसलत करून नोकरी सोडलीच. त्यानंतर माझं मुलासोबत एक नवं विश्व तयार होऊ लागलं.
मी माझ्या बाळाला गोष्टी सांगू लागले. मी वाचून दाखवलेल्या गोष्टी समीक तंतोतंत सांगू लागला. अगदी इंग्लिशही. माझा आत्मविश्वास वाढला. नोकरी सोडण्याचा निर्णय योग्य ठरला होता. 
आता समीकला शाळेत घालायचं होतं. मी अभ्यास घेऊ लागले. तो अभ्यासात गती दाखवू लागला. आजूबाजूचे वाहवा करू लागले. बाळाची पहिली शिक्षिका आईच असते हे म्हणवून घेण्यात मला आंनद वाटू लागला. समीकने पहिलीत पहिला, दुसरीत पहिला, तिसरी-चौथीतदेखील पहिला नंबर काढला.
चौथीत स्कॉलरशिप परिक्षेची तयारी चालू झाली. मी त्याचा दहावीसारखा अभ्यास घेऊ लागले. मुलगाही चांगलीच तयारी करू लागला. परीक्षा झाली. आता आम्ही दोघं निकालाची वाट पाहू लागलो. तोही मला हिरीरीने सांगू लागला, “आई, माझ्या फार तर पाच-सहा चुका असू शकतील. त्याच्यावर नाही.” तो मेरिटमध्ये येणार, त्याचं खूप कौतुक होणार हा विश्वास मलाही होताच.
दुसऱ्या दिवशी ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी मी कम्प्युटरवर बसले. समीकही शेजारी होताच. त्याचा नंबर चेक करू लागले. आता माझी आई छान बातमी देणार या आशेने तो पाहत होता. पण माझ्या चेहर्यावरचे भाव झरझर बदलत होते. मी पुन्हा-पुन्हा नंबरावरून निकाल पाहत होते. मलाही सांगताना जड जात होतं.. “बाळा, मार्क्स कमी आहेत.” हे ऐकताच तो मटकन खाली बसला. रडू लागला. मला कळेना की याला आता कसं समजवायचं. प्रसंग माझ्यासाठी नवीनच होता. समीक अगदी हताश होऊन रडताना मी प्रथमच पाहात होते. कशीबशी समजूत काढून मी त्याला शांत केले.

हा इतका हताश का झाला? मी कारण शोधू लागले. माझ्या लक्षात आलं की मी त्याला सगळ्या गोष्टी यशस्वी लोकांच्याच सांगत होते. अपयशाबद्दल मी त्याला कधी सांगितलंच नाही. माझी चूक माझ्या लक्षात आली. यश मिळालं नाही तर जीवनात काही अर्थ नाही, असंच त्याच्या मनावर मी नकळत बिंबवत होते. त्या प्रसंगानंतर मी आणि संदीपने ठरवलं की समीकला त्याच्या कलेने त्याचा अभ्यास करू द्यायचा. त्याने स्वतःच अभ्यास करावा, यासाठी त्याला वेळ दिला. हे करताना त्याला त्रास होत होता. तो अभ्यासात थोडा मागे पडला. पण स्वप्रयत्नामुळे त्याची हताशा गेली. आता समीक मोठा झाला आहे. स्वतःची कामं स्वतःच करतो. कधी अभ्यासात कमी पडला तर सांगतो, मी थोडा अभ्यास कमी केला.
यश आणि अपयश हे दोन्ही जीवनाचे भाग आहेत. यश साजरं करायचंच. आणि अपयशही पचवायचं, हे आता तो शिकला आहे. पालक म्हणून आम्ही त्याला ते शिकायला फक्त मदत केली.
 - लता परब


Sunday 26 February 2017

अन्नदात्री ज्योती

ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जिल्ह्यातील कट्यार गावात ज्योती देशमुख यांचं पारंपरिक शेती करणारं एकत्रित कुटुंब. घरी २९ एकर वडिलोपार्जित शेती. घरात पती संतोष आणि मुलगा हेमंत, सासरे पुरुषोत्तम, दीर सुनील, त्याची पत्नी आणि मुलगी असं 'गोकुळा'सारखं कुटुंब. पण २००१ पासूनची सहा वर्ष ज्योतीताईंची सर्वस्व हिरावून घेणारी ठरली. नियतीने या घरावर एकामागून एक आघात केले. 
शेतीतील नापिकीमुळे ज्योती यांचे सासरे पुरुषोत्तम यांनी २००१ मध्ये, शेती आणि व्यवसायातील अपयशामुळे दीर सुनील यांनी २००४ मध्ये आणि या आघातांना तोंड देताना यश न मिळाल्याने पती संतोष यांनीही २००७ मध्ये मृत्यूला कवटाळलं. ज्योती यांच्यावर आभाळच कोसळलं. दहा-बारा वर्षांचा मुलगा हेमंत, दिराची पत्नी आणि मुलगी आणि २९ एकर शेतीसह घराचा गाडा हाकण्याचं आव्हान त्यांच्यासमोर होते. नापिकीचा फेरा संपता संपत नव्हता. दहावीपर्यंत शिकलेल्या, घराचा उंबरठा कधीही न ओलांडणाऱ्या ज्योती यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय अनेक आव्हानांनी भरलेला होता. 
शेतीविषयी अज्ञान. हे झेपेल की नाही ही भीती, शेती विकण्यासाठी काहींचा दबाव, धमक्या, एका नातेवाईकाने केलेला शेती हडपण्याचाही प्रयत्न. मात्र, ध्येय निश्चित केलेल्या ज्योतीताईंनी हा खाचखळग्यांचा प्रवास जिद्दीने सुरु ठेवला. त्यांनी शेती कसायला सुरवात केली. हळूहळू शेतीतील बारकावे आत्मसात केले. कापूस, सोयाबीन, तूर या पारंपरिक पिकांच्या साथीने सुरुवात केली. हा भाग मुळात कमी पाण्याचा. त्यातूनही खारपाणपट्टा. तरीही त्यांनी शेतात बोअर घ्यायचं धाडस केलं. बोअरला गोडं पाणी लागलं, वीजही आली. मग बागायती शेती सुरु केली. आता त्या दुचाकीने शेतात जातात. बैलगाडी जुंपण्यापासून शेतातील प्रत्येक काम त्या आता सहज करू लागल्या आहेत. मुलगा हेमंत संगणक अभियंता झाला आहे. त्यांनी आपल्या पुतणीला तिच्या आईसह अकोट इथे शिक्षणासाठी ठेवलं आहे.

शेतीच्या भरवशावरच त्यांनी नवं घर बांधलं. आता लवकरच शेतातील कामासाठी त्या स्वतःचा ट्रॅक्टर घेणार आहेत. अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ज्योतीताईंचा यशस्वी शेतकरी म्हणून गौरव केला. याशिवाय जिल्हा पोलीस दलानेही त्यांचा 'जननी सप्ताहा'त विशेष सत्कार केला.

- कुंदन जाधव.

शेतकर्‍याने सांभाळलं मजुरांना, मजुरांनी सांभाळलं शेतीला


मिलिंद वैद्य, गाव: रीळ, तालुका, जिल्हा रत्नागिरी. या उच्च शिक्षित तरूण प्रयोगशील शेतकऱ्याने मजुरांची काळजी घेत, निसर्गाच्या लहरीपणावर मात करत, योग्य नियोजनाद्वारे सगुणा पद्धतीने भाताचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. या पद्धतीचा फायदा लक्षात घेऊन जिल्ह्यात यंदा आणखी १०१ शेतकरी हा प्रयोग करीत आहेत. या सर्वांचेही उत्पन्न वाढेल असा अंदाज आहे. या नव्या ‘सगुणा’ पद्धतीमुळे मशागतीवर होणारा ५० टक्के खर्च कमी होतो. खतांच्या खर्चात ५० टक्के बचत होते. पावसाने ओढ दिल्यास फारसा परिणाम होत नाही आणि कमी पाण्यावरही पीक चांगले येते,
मिलिंद वैद्य यांचा मुख्य व्यवसाय आंबा उत्पादन. ते वार्षिक सहा हजार पेट्या इतके आंब्याचे उत्पादन घेतात. त्यांच्याकडे ३० मजूर वर्षभर कामाला असतात. मजुरांना प्रशिक्षण, वर्षभर काम, चांगले वेतन, त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी, मजुरांच्या मुलाना चांगले शिक्षण, मजुरांच्या भविष्याची तरतूद आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याच्या बांधिलकीमुळे त्यांच्याकडे वर्षभर मजूर उपलब्ध होतात. ते चांगले कामही करतात. हेच यशाचे गमक आहे, असे मिलिंद वैद्य सांगतात.
भात आणि आंबा उत्पादनासाठी गेल्या काही वर्षात कोकणातले तरुण शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत आहेत. या प्रयोगांना स्थानिक शेतकरी चांगला प्रतिसाद देत आहेत. शेतकऱ्यांचे प्रयत्न आणि सरकारच्या विविध योजना यातून रत्नागिरी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर क्षेत्रात आंबा आणि काजूची तर ३ लाख हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड झाली आहे.
सध्या बागायती शेतीकडे कल वाढत आहे. निसर्गाचा लहरीपणा, मजुरांची उणीव आणि वाढता खर्च यामुळे भातशेतीचे क्षेत्र मात्र कमी होताना दिसतेय. मात्र या परिस्थितीवर मात करीत भाताची शेती फायद्यात कशी करावी ते मिलिंद वैद्य यांनी भाताची त्रिसूत्री लागवड करत हेक्टरी १९.२४ टन उत्पादन घेत दाखवून देले आहे.
भात आणि आंबा या पिकांसाठी कोकणाची विशेष ओळख आहे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे ही ओळख टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. पारंपारिक भात लागवडीसाठी रोप काढणे, नांगरणी, भाजावळ करणे, पुनर्लागवड,चिखलणी, फोड, बेर करावी लागते यासाठी मजूर मोठ्या प्रमाणावर आवश्यक असतात. यामुळे जंगलतोड होते. निसर्गावरही परिणाम होतो. याबरोबरच पारंपारिक शेतीमुळे उत्पादनखर्चही वाढतो. मिलिंद वैद्य यांनी केलेल्या सगुणा पद्धतीमध्ये या सगळ्या गोष्टी केल्या जात नाहीत तर गादी वाफे तयार करून लागवड केली जाते. दहा वर्षे नांगरट करावी लागत नसल्याने खर्च वाचतो, उत्पादनखर्च कमी येतो आणि दोन किवा तीन पिकेही प्रतिवर्षी घेता येतात. या पद्धतीमुळे जिल्ह्यातील पारंपारिक वायंगणी शेतीला चांगले दिवस येतील आणि वायंगणी शेती परत एकदा सुरु झाली की पाण्याचे चक्र सुरळीत सुरु होऊ शकेल, असे शेतकरी सांगतात. कारण वाढत्या पाणीटंचाईचे मूळ कारण हे चक्र मोडण्यात आहे. त्यामुळे हा प्रयोग रत्नागिरी जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरेल, हे नक्कीच.
-निलेश डिंगणकर.

Saturday 25 February 2017

आता आनंदी शिकेल

अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील २८ वर्षाचे युवा शेतकरी गणेश रामदास सरोदे यांनी २०१३ मध्ये आत्महत्या केली. शिक्षित असल्याने, आत्महत्येपूर्वी गणेशने पुण्यात नोकरी शोधली. मात्र, तिथे जम न बसल्याने तो गावी परतला आणि वडिलोपार्जित दोन एकर शेती सांभाळून उदरनिर्वाह करू लागला. निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक समाधानकारक होत नव्हते आणि कर्जाचा डोंगर वाढत होता. यामुळेच त्याने २०१३ मध्ये आत्महत्या केली. 
पतीनिधनानंतर सासू- सासर्‍यांचा सांभाळ आणि मुलगी आनंदी हिचं शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी गणेशची पत्नी सुवर्णा सरोदे हिच्यावर आली. नापिकीमुळे आलेल्या हलाखीच्या स्थितीत शिवणकामातून कुटुंबाला सांभाळण्याचा प्रयत्न सुवर्णा करतेय. गावातील तलाठी संदीप बोळे यांना हे कळले. आणि गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनी त्यांनी चार वर्षाच्या आनंदीच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. आनंदी सध्या नामांकित शाळेत शिक्षण घेत आहे.
 तलाठ्यांच्या भ्रष्टाचारावर टीका होते. पण संदीप बोळे यांच्या सदाचाराचं कौतुकही करायला पाहिजे. प्रशासनाचा परीघ ओलांडून, माणुसकीचं वर्तुळ त्यांनी पूर्ण केलंय. अकोल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी सुरु केलेल्या ‘मिशन दिलासा’ मधून हे काम करण्याची प्रेरणा मिळाली, असं संदीप बोळे सांगतात.


- कुंदन जाधव.

सुधाकरचा पुनर्जन्म












ऑक्टोबर महिन्यातल्या गडचिरोली दौर्‍यात सुधाकर जगुजी गावडे हा तरूण भेटला. हा येरंडी गावातला छोटा शेतकरी. येरंडी हे गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातलं लहानसं गाव. लोकसंख्या अवघी तीनशे. गावात ग्रामपंचायत सदस्यांशी आणि इतर गावकर्‍यांशी गप्पागोष्टी सुरू होत्या. येरंडीत झालेल्या सुधारणा हा विषय होता. खुद्द गावकर्‍यांकडूनच त्याबद्दल ऎकायला छान वाटत होतं. कारण सुधारणा त्यांनीच घडवून आणल्या होत्या. गप्पांदरम्यान, सुधाकरने पुढे येऊन सांगितलं की अवघ्या चार दिवसांमागे त्याला जणू पुनर्जन्म मिळालाय. कसा? 
तर त्याला शेतात काम करताना साप चावला. आणि तो शेतातच कोसळला. त्याच्या बायकोच्या हे लक्षात आलं आणि तिने आरडाओरडा करून लोकांना गोळा केलं. लोकांनी ताबडतोब ‘सर्च’ची ऍब्युलन्स बोलावली आणि सुधाकरला ‘सर्च’च्या दवाखान्यात नेलं. त्याला तिथे त्वरित उपचार मिळाले. तो वाचला. (‘सर्च’ ही डॉ अभय आणि डॉ राणी बंग यांनी स्थापन केलेली गडचिरोलीस्थित विख्यात संस्था.) स्वतःच्या सर्पदंशाची घटना सुधाकर स्वतःच सांगत होता. सुधाकर आणि इतर गावकरी सांगत होते की सर्पदंश झाल्यावर त्यांनी पुजार्‍याकडे (वैदू) जाणं कधीच बंद केलंय. कारण दवाखान्यात गेल्यावर जीव शंभर टक्के वाचतो. 
गावातल्या सुधारणेचा याहून मोठा आणि जीताजागता पुरावा कुठला?
- मेधा कुळकर्णी

Thursday 23 February 2017

मिल्खासिंगची मराठी वारसदार!


नाव पूनम. तरीही जीवनात काळोख दाटलेला! जन्मत:च दृष्टीहिन असलेली पूनम खेळाच्या कसोटीत उतरली, जिंकली. दिल्लीला नुकत्याच पार पडलेल्या विकलांगांच्या राष्ट्रीय स्पर्धेत जखमी अवस्थेतही पुनम भीमराव ईटकरे हिने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत देशातून पहिला क्रमांक आणि राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. पहिल्या दिवशी १०० मीटर स्पर्धेत धावताना पडल्याने तिच्या गुडघ्यांना चांगलाच मार लागला. पण आता स्पर्धा जिंकायचीच या जिद्दीने ती उठली. १०० मीटरनंतर २०० मीटर धावण्याच्या शर्यतीचा तिने जखमी अवस्थेत कसून सराव केला. दुसऱ्या दिवशी गुडघ्याची जखम घेऊन ती हिरीरीने सहभागी झाली. जिद्दीने धावली आणि सोबतच्या अनेक स्पर्धकांना मागे टाकत पहिली आली. पूनम लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान. डोळ्यांमध्ये जन्मत:च मोतीबिंदू नसल्याने तिच्या दृष्टीहीनतेवर उपचार होऊ शकले नाहीत, असे भीमरावांनी सांगितले. तिचे शालेय शिक्षण पोफाळी गावातील वसंतराव नाईक अपंग शाळेत झाले. ८वी ते १२वी पर्यंतचे शिक्षण पोफाळीच्याच श्री शिवाजी विद्यालयात झाले

बारावीत ८६ टक्के गुण घेऊन तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली. सध्या ती नागपूरच्या वानाडोंगरी येथील ज्ञानज्योती अध्यापक विद्यालयात डीएड करीत आहे. यापूर्वी राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत तिचा पहिला क्रमांक आला होता. पूनम आपल्या यशाचे श्रेय आई,वडील व शिक्षकांना देते. ती म्हणते,"मला खेळातच करिअर करायचे आहे. आंतरराष्ट्रीय खेळात देशाचे नाव सातासमुद्रापार न्यायाचे आहे.भविष्यात अंधांची काठी होण्यासोबतच आयएएस अधिकारी व्हायचे स्वप्न आहे. " 

छोट्या मार्लेगावातून (ता उमरखेड, जि यवतमाळ) ती थेट राजधानी दिल्लीत पोहोचली. प्रवास सोपा नव्हताच. वडील भीमराव ईटकरे यांची शेती असूनही उत्पन्न नाही. म्हणून ते आणि तिची आई निर्मला रोजंदारीने काम करतात. पूनमच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. धाकटा भाऊ शुभम शेगाव येथे अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. 
तिचे वडील म्हणतात, "समाज पुनमला नेहमी आंधळी म्हणून हिणवायचा. त्यामुळे आम्ही व्यथित व्हायचो. पण आज आमच्या याच आंधळ्या पूनमने राष्ट्रीय धाव स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून आंधळ्या समाजाला दिव्यांगांकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला. हिणवणारा समाज आता तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतो आहे. एका बापाला यापेक्षा आणखी काय हवे?"
पूनमचा मोबाईल क्रमांक ९१३०७०२५६० / भीमराव इटकरे - ९१६८२०००६५/ ९६८९०६७७४२

- नितीन पखाले

जिद्दीतून आली समृद्धी


अत्यंत हलाखीची परिस्थिती. पतीला काम होत नसल्याने खैरूण यांच्यावर संसाराची जबाबदारी आली. पन्नाशी गाठलेली. पदरी चार मुली, दोन मुले. पत्र्याच्या शेडचा मोडकातोडका आडोसा असलेलं घर. पावसाळ्यात अर्धा संसार पाण्याखाली. त्या म्हणतात, घर कसं चालवायचं अशी चिंता माझ्यापुढे होती. धुणी-भांडी करत होतेच. मग `राहत' बचत गटाच्या बिनव्याजी कर्जातून शेळ्या घेतल्या. बचत गटाची साथ मिळाली. आता चार मुलींची लग्न करून दिली. मुलांना शिक्षण देतेय. मिरची कांडप मशिन, पिठाची गिरणी चालवून आनंदाने संसार करत आहे, खैरूण अभिमानाने सांगतात.


शमा मन्सूर खान यांचं कपड्याचं दुकान. या व्यवसायापुरती जागाही त्यांच्याकडे नाही. तरीही पत्र्याच्या शेडमध्ये अुपऱ्या जागेत, आणि पैशांत योग्य नियोजन करून त्यांनी आपला व्यवसाय वाढवला आहे. साबेदा बेगम शेख यांच्या पतीचे ५ वर्षापूर्वी निधन झाले. जगण्यासाठी काही उद्योग हवा होता. ‘राहत’ बचत गटाकडून कर्ज घेऊन त्यांनी लाकूड विक्री सुरू केली. आता रोज ५०० रुपयांची लाकूड विक्री करणाऱ्या साबेदा आनंदाने संसार करीत आहेत. ताहेराबी शेख यांना दोन मुले. गटाकडून कर्ज घेतले. आणि बांगड्याचा व्यवसाय सुरु केला. त्यावर संसार उभा राहिला आणि मुलंही शिकली. 

लैला यांचे पती अमिर शेख सेंट्रींगच्या कामावर रोजंदारी करीत होते. लैला यांनी ‘राहत’ बचत गटाकडून कर्ज घेतले आणि पतीला बांधकाम क्षेत्रात गुत्तेदारी करण्यास प्रोत्साहित केले. अमिर सध्या गुत्तेदारी करतात. त्यांच्याकडे स्वत:चे भांडवल तयार झाले आहे. 
खैरूण, ताहेराबी, शमा या सगळ्या संसार उभा करण्यासाठी, व्यवसायासाठी धडपडणार्‍या गरिबीशी झुंजणार्‍या जिद्दी स्त्रिया. त्यांना २०१२मध्ये ‘राहत’ पतसंस्थेच्या बचत गटाने बिनव्याजी कर्ज दिले आणि गालिबनगरातील १६ जणी स्वत:च्या व्यवसायातून समृध्द झाल्या.


 ‘राहत’चे सचिव आशरफ शेख म्हणतात, "पतीच्या व्यसनाधीनतेमुळे जेव्हा संसार उघड्यावर पडायची वेळ येते, तेव्हा अशा कुटुंबात महिला संसाराचं छत्र बनतात. शहरातील काही भागात यासाठी सर्व्हे केला. आणि २०१२ पासून महिलांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यास सुरुवात केली. सध्या दोन बचत गट आहेत. २०१७ मध्ये आणखी दहा सुरू करणार आहोत". बचत गटाकडून कागदपत्रांच्या अडथळ्यांशिवाय महिलांना छोट्या व्यवसायासाठी तातडीने बिनव्याजी कर्ज दिले जाते. त्यामुळे अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या. शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू असलेल्या उस्मानाबादसारख्या जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करून कुटुंबाचा आधार होणार्‍या, समृद्धी खेचून आणणार्‍या या महिला कौतुकास पात्र आहेत.
- चंद्रसेन देशमुख.

रुग्ण हेच कुटुंब

  
महाविद्यालयात असताना विद्यार्थी आघाडीचे नेतृत्व, नंतर भाजपाच्या युथ विंगमध्ये भरीव कामगिरी...जगदीश मुळीक यांच्या राजकारणातल्या कारकिर्दीची सुरूवात अशी विद्यार्थीदशेतच झाली. 
जगदीश आमदार म्हणून पहिल्यांदाच निवडून आले, तरीही तळागाळातील सततचा लोकसंपर्क आणि लोकसमस्यांची जाणीव असल्याने निवडून येता क्षणी कामाला कुठून सुरुवात करावी, असा प्रश्न त्यांना पडला नाही.
सर्वच मोठ्या शहरांत कचर्‍याची समस्या मोठी आहे. ती दूर करण्यासाठी जगदीश मुळीक ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत अनेक उपक्रम राबवत आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधून घेतली आहेत. पाणी हा महत्वाचा विषय. यासाठीच भामा-आसखेड प्रकल्पाचा पाठपुरावा त्यांनी केला आहे. या प्रकल्पपूर्तीनंतर पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल असा जगदीश मुळीक यांचा विश्वास आहे.
रुग्णसेवा हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. वडगावशेरी मतदारसंघातील येरवडा मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या समस्यांची जगदीशजींना विशेष जाणीव आहे. घरातील लोकांनी दूर लोटलेल्या या रूग्णांना त्यांनी आपले कुटुंब मानले आहे. सणासुदीला ते आपल्या कुटुंबापेक्षाही जास्त वेळ या लोकांसोबत घालवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतात. रुग्णांना, रुग्णालयाला लागणाऱ्या विविध गरजेच्या वस्तू, मशीन्स यांचा पुरवठा नीट होईल, हे बघतात. 
मतदारसंघातील पालिकेच्या शाळांमध्ये ध्वजारोहण व इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने नियमितपणे जाऊन गरीब विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणं, त्यांच्या गरजांची पूर्तता करणं जगदीशजी करत असतात. मुले ही वोट बँक नसल्याने त्यांच्या समस्यांची तड कोण आणि कशी लावणार या प्रश्नावर जगदीशजी म्हणाले, “आईला मुलांच्या समस्या न बोलताही कळू शकतात, त्याचप्रमाणे तळमळीच्या कार्यकर्त्याला अशा समस्यांची जाणीव आपसूकच असते, असायला हवी.” मतदारसंघातील अनाथ मुलांना निवारा-शिक्षण देणार्यां संस्थांनाही ते मदत करत असतात. 
वडगावशेरीत सनसिटीसमोर त्यांचे धाकटे बंधू नगरसेवक योगेश मुळीक यांच्या पुढाकाराने बांधलेले राजे शिवाजी महाराज उद्यान हे आता एक प्रेक्षणीय ठिकाणच झाले आहे. मुलांसाठी, जेष्ठ नागरिकांसाठी लागणाऱ्या सर्व सोयी, भरपूर खेळण्याचे साहित्य यांची रेलचेलच तिथे आहे. सुरक्षेचा विचार करून एवढया मोठ्या उद्यानात त्यांनी CCTV कॅमेरेही बसवून घेतले आहेत. संध्याकाळी संपूर्ण उदयान सौर उर्जेवर चालणाऱ्या दिव्यांनी उजळून निघते.
विधिमंडळात विषय मांडण्यासाठी कुठून माहिती मिळवता? यावर जगदीशजींचे उत्तर - “तळागाळातील लोकांशी, विविध विभागात राहणाऱ्या सर्व स्तरातील नागरिकांशी नेहमीच संपर्क ठेवून असल्याने, नागरिकांच्या विविध समस्यांची कल्पना असतेच. नियमित वृत्तपत्रवाचनातूनही समस्यांची ओळख होतेच.”
‘नवी उमेद’ या फेसबुक पेजचे जगदीशजींनी स्वागत केले. आणि असा उपक्रम ‘संपर्क’ संस्थेनेने सुरु केल्याबद्दल अभिनंदन करून ‘नवी उमेद’ला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
- वैशाली देसाई, पुणे

मेळघाटची सीताफळं आली मुंबईत


जागरूक, मेहनती गावकरी, एनजीओ आणि शासन यांनी मिळून केलेले प्रयत्न कामी आले
मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या पायविहीर गावात्ले तरूण यंदा पहिल्यांदाच सीताफळं घेऊन मुंबईला आले होते. "100रुपयाला एक बाॅक्स. एका बॉक्समध्ये 24 सीताफळं. याप्रमाणे पाच तासात आमचे 180बाॅक्स विकले गेले." आदिवासी विकास महामंडळाचे वाहनचालक श्रीधर काळे मुलांना मदत करताना सांगत होते. "सामूहिक वनहक्क कायद्यामुळे आम्हा तरुणांना गावातच रोजगार निर्माण झालाय. वनाचं नियोजन, रखवाली आम्हीच करतो. यासाठीचं प्रशिक्षण आम्हाला वनखात्याकडून मिळालं आहे." पायविहीरचे रवी येवले सांगतात. या सगळ्यात ‘खोज’ या संस्थेचा सिंहाचा वाटा आहे", असंही ते सांगतात. जागरूक, मेहनती गावकरी, एनजीओ आणि शासन यांनी मिळून केलेले प्रयत्न कामी आले आहेत.
 मेळघाटाच्या पायथ्याशी वसलेलं पायविहीर गाव. वनहक्क कायद्यांतर्गत 2012मध्ये 192 हेक्टर जमीन या गावाला मिळाली. तेव्हापासून या जमिनीवर आवळा, सीताफळ, जांभूळ, कडुलिंब, बांबू या्सारखी दोन लाखांहून अधिक झाडं लावण्यात आली. पायविहीरपासून कुंभीवाघोली, खतिजापूर आणि उपत्खेडा या गावांनीही प्रेरणा घेतली. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातली ही चार पाचशे लोकसंख्येची गावं. 

या चारही गावातले तरुण आता वनहक्क आणि सामूहिक ग्राम वननियम अंतर्गत आवळा आणि सीताफळांची राज्यातल्या विविध शहरात जाऊन विक्री करतात. ‘खोज'नं या परिसरात वनहक्क कायद्याबाबत जागृती केली. ग्रामसभांना दावा मिळाला खरा पण जंगलाचं नुकसान झालं होतं. जमीन उजाड झाली होती. जंगलाचं पुनरुज्जीवन करण्याचं आव्हान गावकऱ्यांनी आव्हान पेललं. उजाड झालेल्या 192 हेक्टर वनजमिनीचं जंगलात रूपांतर केल्याबद्दल पायविहीरला 'खोज'संस्थेसह 2014 चा यूएनडीपी पुरस्कार; तर खतिजापूरला संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत 2015 ला दुसरा पुरस्कार मिळाला.
जंगलव्यवस्थापन, शासनयोजना याची माहिती ‘खोज’ने दिली. वृक्षलागवड, मृदा संवर्धन, सिंचन अशी कामं ‘मनरेगा’मधून करण्यात आली. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचं साहाय्य लाभलं. सामूहिक वनहक्क कायद्यांतर्गत पिकवलेला माल बाहेरगावी घेऊन जाण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्या वाहनाची व्यवस्था होतीच.
"चार वर्षात मुलं आता चांगली तयार झाली आहेत. संस्था आणि मुलं चर्चा करतात, प्लॅनिंग करतात. आता बहुतांश काम मुलंच करतात." खोजच्या पूर्णिमा उपाध्याय म्हणाल्या. मेळघाटच्या पायथ्यापाशी समृद्धीची चाहूल लागली आहे.
 : सोनाली काकडे.

Wednesday 22 February 2017

हेल्प किसान अभियान





नांदेडमधील मधुमेहतज्ञ डॉ. महेश तळेगावकर यांनी हेल्प किसान अभियान सुरु केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे काम ते करत आहेत. खोऱ्याने पैसे ओढणाऱ्या डॉक्टरांच्या रांगेत हा कोण वेडापीर शेतकरी मित्रांसाठी धडपडतो आहे, असा प्रश्न पडल्याने डॉ. महेश तळेगावकर याबद्दल विचारले.
डॉ. महेश तळेगावकर म्हणाले, ‘नुकतीच नांदेड जिल्ह्यातील अनेक गावामध्ये, मी आरोग्य तपासणी शिबीरे घेतली. तेव्हा जाणवलं की अनेक मधुमेही रुग्णांनी उपचारासाठी पैसे नसल्यामुळे उपचार बंद केले आहेत. हा दुष्काळाचा परिणाम. अनेक रुग्णांच्या रक्तांमध्ये जेवणानंतरच्या साखरेचे प्रमाण ६०० च्यावर गेल्याचे आढळून आले आहे. या गंभीर प्रकारामुळे मधुमेही रुग्णांची शुगर चेकअपसहीत वर्षभर मोफत तपासणी करायचे ठरवले."
नांदेड जिल्ह्यातील जवळपास १२५ दुष्काळग्रस्त गावांतील मधुमेही रुग्णांना डॉ. तळेगावकर आज मोफत वैद्यकीय सुविधा देत आहेत. सुट्टीच्या दिवशी वेगवेगळ्या गावात ते चेकअप कँपचे आयोजन करतात. 
यासाठी काही औषध कंपन्यानी मोफत औषधे उपलब्ध करून दिली आहेत. दानशूर व्यक्तीही मदत करत असतात. ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या न्यायाने तळेगावकर आपला खिसा आनंदाने रिकामा करायला तयार असतात.
डॉ तळेगावकर म्हणतात, "बदलत्या ऋतूचक्रामुळे ग्रामीण अर्थचक्र पूर्णपणे कोलमडून पडले आहे. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेच. मात्र, दुष्काळाची तीव्रता मोठी असल्यामुळे समाजानेदेखील प्रयत्न करणे गरजेचे आहे. बळीराजा एकटा नाही, संपूर्ण समाज त्याच्या पाठीशी उभा आहे. हा आत्मविश्वास त्यांच्यात जागृत करण्यासाठीच 'हेल्प किसान अभियान' राबवत आहोत. मराठवाड्यातील प्रत्येक डॉक्टराने एक तरी गाव दत्तक घेऊन त्या गावातील आपल्या स्पेशालिटीच्या रुग्णांची मोफत तपासणी करावी."
डॉ. महेश तळेगावकर -
- सु.मा.कुळकर्णी

स्वमग्नतेतून स्वयंपूर्णतेकडे पहिलं पाऊल


एक गुटगुटीत बाळ आपल्या घरी जन्माला यावं अशीच आमचीही इच्छा होती. पण, आपला पहिला मुलगा ऑटिस्टीक आहे, हे कळलं आणि सुखस्वप्नचित्रच विस्कटून गेलं. इथचं आमचं पहिलं पाऊल पडलं स्वमग्नेतेच्या जगात. मग ४ नोव्हेंबर २०११ रोजी आमच्यासह पुणे येथील डॉक्टर अमिता पुरोहित, बेळगावचे शंशाक कोणो, मिलिंद कंक आणि काही लोकांनी एकत्र येऊन 'आरंभ'चा पाया रचला. 
एक अद्ययावत, आधुनिक असं मराठवाड्यातलं पहिलं स्वमग्न मुलांसाठीचं केंद्र ‘आरंभ’! मग मी विशेष बी.एड.पूर्ण केलं. खास प्रशिक्षण घेतलेला, मुलांच्या प्रत्येक गरजेला ओळखून त्यावर योग्य उपाय करणारा शिक्षकवर्गही नेमला.
आपल्या मुलांना विशेष प्रशिक्षणाची गरज आहे हेच आई-वडील मान्य करत नाहीत. अशा मुलांचा आधार होणे, हे मूल पुढे स्वावलंबी होऊ शकते हा विश्वास त्यांना देणे गरजेचे असते. माझ्या मुलाला विविध थेरपी देण्यासाठी आम्ही बरीच धावपळ केली. त्यातूनच जाणवलं, सर्व थेरपीज एकाच ठिकाणी मिळायला हव्यात. उत्तम दर्जाचे शिक्षण पुरवणे, विद्यार्थांना स्वावलंबी बनविणे, स्वमग्न मुलांविषयी जागृती करुन मुलांच्या शिक्षणासाठी पालकांना प्रोत्साहित करणे हे आजचं 'आरंभ'च काम. 'आरंभ'मध्ये 28 विद्यार्थी आहेत. मुलांच्या क्षमता विकसित करण्यासाठी आवाज, अॅिक्युपेशन, प्ले, म्युझिक, ड्रामा, मास्क,स्पिच आणि फिजिओथेरपीचा उपयोग केला जातो. 
आवाज थेरपीतून मुले न बोलता आपल्या भावना दुस-या माध्यमाच्या सहाय्याने दर्शवू शकतात. अॅाक्युपेशनल थेरपीने आपल्या अतिउत्तेजीत भावनांवर, अति चंचलतेवर नियंत्रण ठेवायला शिकतात. प्ले थेरपीतूनही उर्जा योग्य ठिकाणी वापरली जाते. ड्रामा थेरपी विविध भावनांचे प्रकटीकरण कसे करायचे हे शिकवते. मास्क थेरपीत फक्त डोळे उघडे ठेवले जातात. त्यामुळे स्थिर नजर देणे ह्या मुलांना शक्य होते. मुलांच्या समस्या, अडचणी, प्रश्न यावर पालकांसाठी कार्यशाळा होतात. 
प्रत्येक मुलात सूप्त गुण असतात. स्वमग्न मुले क्षमता लवकर प्राप्त करू शकत नाहीत. पण त्यांची बुध्दी सामान्य मुलांप्रमाणेच असते. त्यासाठी आमचा आर्ट झोन काम करतो. इथं 10 वर्षांवरील मुलांना त्यांच्यातील कलागुणांनुसार प्रशिक्षण दिलं जातं. आणि मग त्यातून सुंदर कलात्मक वस्तुंची निर्मिती केली जाते. या वस्तुंचे प्रदर्शन, विक्री करून स्वमग्न मुलांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. येथे प्रथमच ब्लॉक-पेंटिंगचे रुमाल, रांगोळ्या, पणत्या, मेणबत्या, लिफाफे, ग्रीटिंग कार्ड्स, पेपरबॅग तसेच सुतळीपासून लेटर-हँगिंग अशा विविध वस्तू तयार करण्यात आल्या. हा प्रयोगही फलदायी ठरतोय. कारण त्यातून त्यांच्या क्षमता वाढत आहेत. विशेष म्हणजे यावर्षी बनविलेल्या वस्तुंची व्रिकी अपेक्षेपेक्षा जास्त झाली. त्यामुळे मुलांची बँकेंत खाती उघडता आली. 'आरंभ'च्या छोट्या मित्रांनी स्वयंपूर्णतेच्या दिशेने उचललेले हे पहिले पाऊल. 
- अंबिका टाकळकर.

कर्ज घेऊन बांधलं शौचालय



अकोल्यातल्या कुंभारी गावच्या सुमनबाईंची ही गोष्ट. जिल्हा परिषद शाळेत खिचडी करायचं आणि वाटायचं त्याचं काम. घरी अठरा विश्व दारिद्र्य, त्यातही सामाजिक कार्य करण्याची ओढ. सुमनबाईंनी १५ ऑगस्टला पंतप्रधानांचं भाषण ऐकलं. आणि त्याने प्रेरित होऊन, शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती हलाखीची. पण, दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव नाही. त्यामुळे कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ नाही. तरीही खचून न जाता, आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी बचतगटाचं कर्ज घेऊन त्यांनी घरी शौचालय बांधलं. 
सुमनबाईच्या कार्याची दखल घेवून १९ नोव्हेंबरला जागतिक शौचालय दिनानिमित्त कुंभारी येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांचा सत्कार करण्यात आला. गाव हागणदारी मुक्त व्हावं आणि परिसर स्वच्छ राहावा, या सुमनबाईच्या जिद्दीला मग गावकऱ्यांनीही साथ दिली. आणि बऱ्याच गावकऱ्यांनी आपल्या घरी शौचालय बांधलं. 

सुमनबाई शाळेतील विद्यार्थ्यांची लाडकी आज्जी आहे. या आजीच्या हाताच्या खिचडीची चव काही औरच... म्हणूनच, आजी एखाद दिवशी सुटीवर असल्या तर दुसऱ्याच्या हातची खिचडी मुलांना बेचव वाटते. आजीची साफसफाई मुलांना खूप आवडते म्हणून, खिचडीही तिच्याच हातची हवी असा आग्रह मुलांचा असतो. 
दारिद्र्य, हलाखी मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून, त्यांनी आपल्या मुलीला एम.ए.बी.एड. पर्यंतच शिक्षण दिलं आहे. आज त्यांची मुलगी कुंभारी इथेच अंगणवाडीसेविका म्हणून कार्यरत आहे. सुमनबाईसारखींच साधीसुधी माणसंच स्वच्छ भारताचं स्वप्न पूर्ण करू शकतात.
- कुंदन जाधव.

Saturday 11 February 2017

उत्तम शेती : झिरोबजेट शेतीनं सावकारी कचाटा सुटला

नांदेड जिल्हा. लोहा तालुक्यातील दापशेड येथील विश्वनाथ गोविंदराव होळगे यांच्या झिरोबजेट शेतीची ही गोष्ट. विश्वनाथ होळगे यांचं एकत्र कुटुंब. घरची १४ एकर शेती. रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके वापरून शेती नापीक बनलेली. प्रत्येक पिकाचा उत्पादन खर्च वाढत गेल्याने तोट्यात चालणारी. गावातील अॅड.उदय संगारेड्डीकर आणि केशव राहेगावकर हे पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या बार्शी येथील शिबिरातून शून्य खर्चाच्या नैसर्गिक शेतीचे तंत्र शिकून आलेले. त्यांनी गावातील शेतकऱ्यांना या शेतीचे तंत्र समजावून दिले. होळगे यांनीही हे तंत्र शिकून घेतलं आणि घरच्या शेतीत हा प्रयोग करायचं ठरवलं. झिरोबजेट नैसर्गिक शेती म्हणजे काय तर कोणतंही पीक घेताना मुख्य पिकात त्याच हंगामात येणारी आंतरपिके घ्यायची. या आंतरपिकाच्या उत्पन्नातून मुख्य पिकाचा पेरणी, बियाणे, मशागत असा सर्व खर्च निघत असल्याने, मुख्य पिक शून्य खर्चात म्हणजेच झिरोबजेट होते. 
बिजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वापसा ही झीरोबजेट शेतीची चतु:सूत्री. 
यापद्धतीत कोणतीही खते, कीटकनाशके, औषधे शेतात टाकावी लागत नाहीत. एका गावरान देशी गायीपासून या पद्धतीत 30 एकर शेती करता येते. केवळ १० टक्के विजेची गरज असते. त्यामुळे वीज आणि पाणीबचत. महागड्या ठिबक सिंचनाची, शेततळ्याची कटकट नाही. उत्पादित शेतमाल विषमुक्त, पौष्टिक, दर्जेदार आणि स्वादिष्ट असतो.
होळगे यांनी हेच तंत्र वापरलं. आणि शेतात गतवर्षी पाच एकर डाळींब लागवड केली. पाण्याचा दुष्काळ असल्याने बोअरच्या तुटपुंज्या पाण्यातून त्यांनी डाळींबाची १५०० झाडे जगविली. यावर्षी यातल्या दोन एकर डाळींबाच्या शेतात बटाटे, काऱ्हाळ, लसूण आणि मोहरी ही आंतरपिके घेतली. सध्या डाळींबाची झाडे लहान असल्याने त्यांचे उत्पन्न नाही. त्यामुळे यावर्षी मुख्य पीक बटाटा हेच आहे. या पिकाचा खर्च आंतरपिकांत वसूल झाला आहे. केवळ देशी गाईच्या शेण-गोमुत्रापासून शेतातच बनविलेल्या जीवामृताच्या फवारण्या यामुळे बटाटे पीक उत्तम आलेले आहे. 
दुसरीकडे तीन एकर डाळींबाच्या शेतात गव्हाचे मुख्य पीक घेतले आहे आणि त्यात हरभरा आणि मोहरी, कोथिंबीर, गवार ही आंतरपिके घेतली आहेत. तिथे साठ क्विंटल गव्हाचे उत्पादन अपेक्षित आहे.
बाजूच्या शेतकरी मित्रांकडे प्रचंड रासायनिक खते, कीटकनाशके आणि औषधांच्या फवारण्या करून फक्त गव्हाचे एकच पीक असल्याचे होळगे सांगतात. होळगे यांच्या गव्हाची ओंबी मोठी आहे आणि गव्हाच्या दाण्याची संख्याही जास्त आहे. गव्हाआधी याच तीन एकरात त्यांनी खरीपात २२ क्विंटल सोयाबीन आणि पाच क्विंटल तुरीचे उत्पन्न मिळवले आहे. होळगे म्हणतात, ‘हे तंत्र वापरून शेतीला सुरुवात केल्यानंतर आमच्या मागचा सावकार सुटला. दरवर्षी पेरणीच्या वेळी ३० हजारांची रासायनिक खते लागायची, पुन्हा चांगल्या पिकासाठी दहा हजाराचे डी.ए.पी. खत लागायचे. शिवाय कीटक आणि तणनाशके लागायची ती वेगळीच. त्यातून ५०-६० हजारांची उधारी व्हायची. नगदी पैसे नसल्यामुळे दुकानदार उधारीत जो भाव लावेल तो मुकाट्याने द्यावा लागायचा. मग कापूस किंवा अन्य पिके येताच दुकानदार सव्वापट रक्कम वसूल करायचा. सुमारे ७० ते ८० हजार रुपये उत्पादनातून दुकानदार म्हणजेच सावकाराला द्यावे लागत’. हा भुर्दंड या तंत्राने वाचवला आणि सावकार सुटला आहे.
- सु. मा. कुळकर्णी.

Thursday 9 February 2017

पावसाचं पाणी जमिनीत जिरवणारा अधिकारी

एखादा कल्पक आणि तळमळीचा अधिकारी त्याच्या प्रत्येक पदावर आणि बदलीच्या प्रत्येक ठिकाणी लोककारणार्थ काही काम करतोच. 
रमेश भताने २००७ मध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून बीडला होते. तेव्हापासून त्यांना एक काम करायचं होतं. पुन्हा दोन वर्षांपूर्वी बीड आणि औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालक या पदावर ते आले आणि कामाला लागले. जिल्ह्यातील १४०३ गावांमध्ये दहा लाख हेक्टरपैकी लागवडीसाठी आठ लाख हेक्टर सोडल्यास पडिक क्षेत्रावर काय? यावर डीप सीसीटी, कंपाऊंड बंडिंग, नद्या, नाल्यांचं खोलीकरण, तलावातील गाळ काढणं सारखी कामं दुष्काळात झाल्यास पावसाळ्यात त्याचं फळ निश्चित मिळेल, असा विचार करून त्यांनी नियोजन केलं. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यासमोर मांडले. मंत्री पंकजा मुंडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवलं. आणि मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना म्हणून जलयुक्त शिवार योजना अवतरेली, क्रांतिकारी ठरली ! आधीच्या
पाणलोट विकास योजनेतच जलयुक्त शिवारची बिजं असल्याचं रमेश भताने सांगतात. 
आदर्श गाव आणि इतरांसाठी प्रेरणास्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरेबाजाराचा कायापालटही पंचवीस वर्षांपूर्वी राबवलेल्या राज्य शासनाच्या पाणलोट विकास योजनेमुळेच झाला होता. तेव्हाही तिथे रमेश भताने कृषी विभागाचे अधिकारी होते. सरपंच पोपटराव पवार यांच्या पुढाकाराने तिथे मोठं काम उभं राहिलं. भूपृष्ठावर पडणारं पावसाचं पाणी जागीच जिरवल्यावर भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होते, हे हिवरे बाजारने दाखवून दिलं. रमेश भाताने यांच्या डोक्यात घर करून बसलेलं हे मॉडेल त्यांनी चक्क दुष्काळी, चारशे मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस होणाऱ्या आपल्या मायभूमीत, बीडमध्ये राबवलं. 
१९८७ मध्ये वैजापूर (जि. औरंगाबाद) इथे जलसंधारणासाठी कृषीविभागाने बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यांच्या डिझाइनचं काम भताने यांच्याकडे होतं. १९८८-८९ मध्ये सुमारे दीडशे ते दोनशे बंधारे वैजापूर तालुक्यात बांधण्यात आले. जायकवाडी धरणातून पाणी लिफ्ट करून या बंधाऱ्यात अडवण्याची त्यांची कल्पना होती. यानंतर नगर येथेही त्यांनी पाणलोट विकास योजना कार्यान्वित केली. तेव्हा ते उपविभागीय कृषी अधिकारी होते. पाणलोट, कृषी विभाग, लघूपाटबंधारे,जीएसडीएस, सामाजिक वनीकरण या विभागांनी संयुक्तपणे काम सुरु केलं. तीन तालुक्यांत टँकरमुक्तीसाठी कामं सुरू झाली. या कामांमधून दुष्काळमुक्ती झालीच; शिवाय आम्हाला कामासाठी प्रेरणा मिळाली, असे भताने म्हणाले.
२६ जानेवारी २०१५ रोजी जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा प्रारंभ झाला, पहिल्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील २७१ गावे निवडण्यात आली. यात साडेसहा हजारांवर कामं करण्यात आली. डीप सीसीटी, जुने गॅबियन,सिमेंट आणि गाळाने भरलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ही कामं हाती घेण्यात आली. लोकसहभागातून या योजनेत ६८ तलावांमधील १५ लाख ५० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. अशासकीय, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने नदी, नाल्यांचं खोलीकरण, रूंदीकरण हाती घेण्यात आले. ५५४ किलोमीटर एवढे काम करण्यात आले. शासकीय यंत्रणेकडून ४१ ठिकाणचा ३४ लाख ७१ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. यात सुमारे दीड ते दोन लाख टीएमसी एवढा पाणीसाठा असून, ७५ हजार ९७२ हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी पाणी संरक्षित झालं आहे. २०१६-१७ साठी ५२८१ गावे जलयुक्त शिवारसाठी निवडली गेली आहेत. या गावांमध्ये ३५३२९ कामे पूर्ण झालेली आहेत.
मुकुंद कुलकर्णी,